दक्षिण गुजरात Ram Mandir History Course : राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यांच्याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय.
हा अभ्यासक्रम कोण करू शकतो : आता देशात प्रथमच राम मंदिराच्या इतिहासावर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. गुजरातमधील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात राम मंदिराच्या 500 वर्षांच्या इतिहासावर विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ विद्यापीठातील विद्यार्थीच नव्हे, तर 12 वर्षांवरील कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम केल्यास त्यांना दोन शैक्षणिक गुणही मिळतील.
फी किती रुपये : वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू किशोर सिंह चावडा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. "रामजन्मभूमीचा इतिहास 550 वर्षांचा आहे. आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला होता. हा अभ्यासक्रम 30 तासांचा असून त्याची फी 1100 रुपये आहे. आम्ही संपूर्ण भारतात प्रथमच रामजन्मभूमीच्या इतिहासावर हा संपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार आहोत", असं त्यांनी सांगितलं.
राम जन्मभूमीच्या घटनेला इतिहासाच्या रूपात मांडेल : "या अभ्यासक्रमात बाबरी मशिदीचा वादग्रस्त भाग, मंदिराचा संपूर्ण प्रवास तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा समावेश आहे. या कोर्समध्ये राम मंदिराचा 22 जानेवारीपर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे. हा अभ्यासक्रम या घटनेला इतिहासाच्या रुपात मांडेल. 12 वर्षांवरील कोणीही तसंच ज्यांनी शिक्षण घेतलेलं नाही ते देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात", असं कुलगुरू किशोर सिंह चावडा यांनी सांगितलं.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत मंजूरी : "सुमारे 1 कोटी 40 लाख लोक विद्यापीठाशी निगडीत आहेत. आम्ही त्यांना याबद्दल सांगू आणि सर्वांना माहिती देऊ", असंही ते यावेळी म्हणाले. "हे सरकारी विद्यापीठ असल्यानं, हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सरकारनं मंजूर केलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम असेल. रामजन्मभूमीच्या इतिहासाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. हा अभ्यासक्रम केल्यानं ते गैरसमज दूर होतील", असं कुलगुरूंनी सांगितलं.
हे वाचलंत का :