नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक मनोज शशिधर यांना स्वतंत्रता दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शशिधर यांची निर्भिड आणि इमानदार पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. शशिधर हे गुजरात कॅडरचे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, शशिधर यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास केला आहे.
हेही वाचा - हमारी अधुरी कहानी.. प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कारमध्ये बसून कारला लावली आग
शशिधर यांची जानेवारी २०२० साली सीबीआयच्या सहसंचालक पदावर नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती.
..या प्रकरणांचा केला आहे तपास
शशिधर यांनी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करार, विजय माल्या बँक फसवणूक प्रकरण, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचे प्रकरण, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सारख्या काही मोठ्या प्रकरणांचा तपास केला आहे. शशिधर यांनी अलीकडेच एका रेल्वे अधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयांच्या वसुलीचे प्रकरण उघड केले होते.
२९ सीबीआय अधिकाऱ्यांचाही सन्मान
शशिधर यांच्याव्यतिरिक्त २९ सीबीआय अधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि कौतुकास्पद सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
शशिधर यांनी अनेक पदांवर बजावली महत्वाची जबाबदारी
एका अधिकाऱ्याने सांगितले की, शशिधर हे गुजरातमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर राहिले आहेत. त्यांनी सूरतमध्ये पोलीस आयुक्त, गुजरात दहशतवादविरोधी पथक, अहमदाबाद गुन्हे शाखेच प्रमुख आणि गुजरात राज्य इंटेलिजन्स ब्युरोचे एडीजी पद देखील सांभाळले होते. शशिधर गुजरात पोलीस नियमावली सुधारण्यासाठी बनवलेल्या समितीचे अध्यक्षही होते.
सीबीआयमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामावतार यादव यांनी सांगितले की, ते देखील अगस्ता वेस्टलँड प्रकरणात तपास अधिकारी आहे आणि त्यांनाही विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - दानिशने आमच्याकडून परवानगी घेतली नव्हती, तालिबानचे सिद्दीकींच्या मृत्यूवर स्पष्टीकरण