नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) आज चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी कारवाई करत, दोघांना अटक केली. लहान मुलांच्या पॉर्नोग्राफिक व्हिडिओ आणि फोटोंची हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून खरेदी आणि विक्री करत होते. यानंतर दोघा आरोपींना साकेत न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना २२ जानेवारीपर्यंतची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सीबीआयने याप्रकरणी यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे; तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७-ब कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांपैकी एक व्यक्ती इन्स्टाग्रामवर चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि इतर आक्षेपार्ह गोष्टींची विक्री करत असे. या व्यक्तीकडे क्लाऊड स्टोरेजवर अशा प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले आढळून आले.
इन्स्टाग्रामवर करत विक्री..
हा व्यक्ती इन्स्टाग्रामवर आपल्या साहित्याची जाहिरात करत असे. पेटीएम किंवा गुगल पे अशा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या माध्यमातून तो पैशांची मागणी करत. पैसे मिळाल्यानंतर तो असे साहित्य समोररच्या व्यक्तीला व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा इन्स्टाग्राम अशा माध्यमातून पुरवत असे. ताब्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने मोठ्या प्रमाणात असे साहित्य खरेदी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असे साहित्य पुरवणारा व्यक्ती २०१९पासून हे काम करत होता. त्यामुळे आतापर्यंत त्याने कोणा-कोणाला असे साहित्य पुरवले, आणि आणखी कोण कोण अशा प्रकारची विक्री करत आहे याचाही शोध सीबीआय घेत आहे.
हेही वाचा : अवघ्या ५० रुपयांवरून भांडण, पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न