नवी दिल्ली : देशातील राजकारण्यांना भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करून घाम फोडणाऱ्या 'ईडी'वरच आता नामुष्कीची पाळी आलीय. दिल्ली दारू धोरण प्रकरणात सीबीआयने 'ईडी'च्या एका अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. 'ईडी'मध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणार्या पवन खत्री यांनी या प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने सोमवारी खत्रींसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. आता तपासानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.
या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला : ईडीच्या विनंतीवरून सीबीआयनं सहायक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर या दोन आरोपी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ईडीच्या तक्रारीनुसार, अमनदीप सिंग धल आणि बिरेंद्र पाल सिंग यांनी दारू पॉलिसी प्रकरणात चालू असलेल्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान प्रवीण वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते.
पैशाच्या मोबदल्यात अटकेपासून वाचवण्याचे आश्वासन दिले : प्रवीण वत्स यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात अमनदीप सिंग धल्ल यांना अटकेपासून वाचवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले होते. त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये प्रवीण वत्सची ओळख ईडी अधिकारी पवन खत्री यांच्याशी करून दिली. प्रवीण वत्स यांनी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत अमनदीप धल्ल यांच्याकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये यांच्याकडून ३ कोटी रुपये घेतले.
आश्वासन दिल्यानंतरही ईडीने अटक केली : त्यानंतर दीपक सांगवान यांनी अमनदीप धल्ल यांच्याकडे आणखी दोन कोटी रुपयांची मागणी केली. दोन कोटी रुपये दिल्यास तुमचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले जाईल, असे आश्वासन त्यांनी धल्ल यांना दिले. अमनदीप धल्ल यांनी सांगवान यांची ही मागणीही पूर्ण केली. मात्र, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही ईडीने अमनदीप धल्ल यांना १ मार्च २०२३ रोजी अटक केली.
लाच घेतल्याचे पुरावे सापडले : या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संस्थेतील काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली. ईडीने या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या निवासस्थानांची झडती घेतली. झडतीदरम्यान, प्रवीण वत्स यांच्या निवासस्थानी २.१९ कोटी रुपये रोख आणि १.९४ कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने सापडले. याशिवाय त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये सापडले. ईडीने वत्स यांच्या घरातून दोन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत.
हेही वाचा :