हैदराबाद (तेलंगणा): महाविद्यालयातील सहकारी विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांचा मुलगा साई भगीरथ मुलाविरुद्ध दुंडीगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादच्या उपनगरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाणीचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ऑक्टोबर महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली.
सेल्फी आणि व्हिडीओही आला समोर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय यांच्या मुलाचे नाव समोर आल्यानंतरही पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. हल्लेखोर विद्यार्थ्याचा एक सेल्फी व्हिडिओही मंगळवारी समोर आला. त्याच्याच चुकीमुळे त्याच्यावर हल्ला झाला असे सांगण्यात येत आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी सर्वोच्च समन्वयक सुकेश यांच्या तक्रारीवरून दुंडीगल पोलिसांनी कलम 341, 323, 504, 506 इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इन्स्पेक्टर रमना रेड्डी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदी संजय म्हणाले, हा तर राजकीय सूड: करीमनगरचे खासदार बंदी संजय यांनी आपल्या मुलाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यास एफआयआरला उत्तर दिले आणि त्याला गप्प करण्यासाठी "राजकीय सूड" म्हटले. त्यांनी टीआरएस सरकारवर आरोप केले आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी त्यांच्या मुलांच्या जीवनात गोंधळ घालू नका असे आवाहन केले. तुम्हाला माझ्याशी राजकीय लढायचे असेल तर मुले आणि कुटुंबीयांना आणण्याचा प्रयत्न करू नका. माझा मुलगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करेल, असे ते म्हणाले. दरम्यान हे प्रकरण वाढत असल्याने तेलंगणामध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टीआरएसकडून बंदी पिता-पुत्राचा समाचार: तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) सोशल मीडिया संयोजक एम कृशांक यांनी भगीरथ विद्यार्थ्यावर हल्ला करतानाचे दोन व्हिडिओ ट्विट केले आहेत. ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या राजकीय उंचीचा गैरवापर करत आहेत. त्यांचा मुलगा दोन वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहे. हे दुर्दैवी आहे की, निवडून आलेले प्रतिनिधी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करून आपल्या मुलाचे समर्थन करतात. त्यांनी अद्याप मारहाणीच्या कृत्याचा निषेध केलेला नाही.
हेही वाचा: तेलंगणा भाजप प्रमुख म्हणाले टीआरएस सरकार व्हेंटिलेटरवर लवकरच पडणार