भोपाळ : मध्य प्रदेशच्या मोरेनामध्ये एका अल्पवयीन मुलीची खरेदी आणि बलात्कार केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी बिहारची असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे समजले. त्यानंतर भोला जैन, त्याची आई, आणि पीडितेची मावशी इंदू प्रजापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
एक लाख रुपयांना मावशीनेच केली विक्री..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला तिच्या मावशीने एक लाख रुपयांना विकले होते. १५ दिवसांपूर्वी तिच्या मावशीने भोला जैन याला त्यांच्या घरी आणले होते. त्यानंतर भोला जैन आणि प्रजापती यांनी पीडितेच्या वडिलांना एक लाख रुपये दिले. त्यानंतर भोलाने गावातच पीडितेशी लग्न केले, आणि तो तिला घेऊन अंबाहला आला. त्यानंतर त्याने १२ दिवस तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याबाबत भोलाच्या आईकडे, आणि आपल्या मावशीकडे तक्रार केली असता, त्यांनी याबाबत आणखी कोणाला न सांगण्याची ताकीद दिली.
पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल..
याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला पोहोचल्यानंतर त्यांनी महिला आणि बालकल्याण विभागासोबत मिळून या पीडितेची सुटका केली. यानंतर गेल्या गुरुवारपासून तिला वन-स्टेप सेंटरवर ठेवण्यात आले आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरुन अंबाह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिघांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीची खरेदी करण्यात आली असल्यामुळे, हे मानवी तस्करीचे प्रकरणही होते. मात्र, याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
हेही वाचा : मध्य प्रदेशात पाच वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या