बेंगळुरू : कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होऊन आठवडा उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. काँग्रेसने शुक्रवारी 24 आमदारांची यादी जाहीर केली ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह दहा मंत्र्यांनी 20 मे रोजी शपथ घेतली होती.
या आमदारांनी घेतली शपथ : काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार ज्येष्ठ आमदार एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी, के. व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह के. एन. राजण्णा, शिवानंद पाटील, एस. एस. मल्लिकार्जुन, सुरेश बी. एस., शरणबसप्पा दर्शनपूर, शिवराज संगप्पा तंगडगी, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, रहीम खान, डी. सुधाकर, संस्तोष बोस्ट, माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांचे पुत्र मधु बंगारप्पा, डॉ एम. सी. सुधाकर आणि बी नागेंद्र यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
सर्व वर्गांना मंत्रीमंडळात स्थान : काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी हेब्बाळकर, मधु बंगारप्पा, डी. सुधाकर, चेलुवरायस्वामी, मनकुल वैद्य आणि एम.सी. सुधाकर हे शिवकुमार यांच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसने जाहीर केलेल्या मंत्र्यांच्या यादीत सहा लिंगायत आणि चार वोक्कलिगा आमदारांची नावे आहेत. त्याच वेळी, तीन आमदार अनुसूचित जातीचे, दोन अनुसूचित जमातीचे आणि पाच इतर मागासवर्गीय (कुरुबा, राजू, मराठा, एडिगा आणि मोगविरा) आहेत. कर्नाटक मंत्रिमंडळात दिनेश गुंडू राव यांच्या रूपाने ब्राह्मणांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे.
प्रादेशिक समीकरण साधले : जुने म्हैसूर आणि कल्याण कर्नाटक प्रदेशातील प्रत्येकी सात, कित्तूर कर्नाटक प्रदेशातून सहा आणि मध्य कर्नाटकातील दोन आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. एका अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांना योग्य सन्मान देताना जातीय आणि प्रादेशिक समीकरणे जपून मंत्रिमंडळात समतोल राखला आहे.
हायकमांडने यादी केली फायनल : मात्र, कर्नाटकातील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानीत होते आणि त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्ष नेतृत्वाशी अनेक फेऱ्यांची चर्चा केली. के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या दीर्घ चर्चेनंतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पक्षप्रमुख राहुल गांधी यांनी मंत्र्यांची यादी अंतिम केली.
हेही वाचा :