वाराणसी : महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा असलेल्या वाराणसीतील सर्व सेवा संघ भवनावर शनिवारी बुलडोझरने कारवाई करण्यात आली. आतापर्यंत १२ इमारती बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
सर्व सेवा संघाचा रेल्वेशी जमिनीचा वाद : सर्व सेवा संघाचा रेल्वेशी जमिनीचा वाद सुरू होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या बाजूने आदेश दिला. त्यानंतर शनिवारी पाडकामाला सुरुवात झाली. यावेळी लोकांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान पोलिसांनी सुमारे 10 जणांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार, सेवा संघाकडे जमिनीची कोणतीही ठोस कागदपत्रे नाहीत. अशा स्थितीत रेल्वेने ही जमीन स्वतःची असल्याचा दावा केला आहे.
सरकार जबरदस्तीने कारवाई करत असल्याचा आरोप : सर्व सेवा संघाच्या आवारात पाडकामाचे काम थांबवण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते पोहोचले होते. सरकार जबरदस्तीने ही कारवाई करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर दोन दिवसांपूर्वीच वाराणसीला पोहोचल्या होत्या. मेधा यांना यावेळी कॅम्पसमध्ये येण्यापासून रोखण्यात आले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, तसेच स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी या प्रकरणी आपला विरोध व्यक्त केला आहे. प्रियंका गांधी यांनी सर्व सेवा संघ संकुल पाडणे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वारशावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
सेवा भवन पाडण्याचा सरकारचा डाव : सर्व सेवा संघाशी संबंधित असलेले राम धीरज म्हणाले की, सेवा भवन पाडण्याचा सरकारचा डाव आहे. ही जमीन आम्ही रेल्वेकडून १९६०, ६१ आणि १९७० मध्ये तीन भागांमध्ये खरेदी केली होती. कोषागार निधीत जमा झालेल्या पैशाची पावती आणि सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. मात्र सध्याचे सरकार आणि जिल्हा प्रशासन ही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार देत आहे. बनावट कागदपत्रे तयार करून आम्हाला आमच्या इमारतीतून हाकलून देण्याचा कट रचण्यात आला. हे सरकारचे सुनियोजित नियोजन आहे, असे गंभीर आरोप सर्व सेवा संघाने केले आहेत.
१९४८ मध्ये 'सर्व सेवा संघा'ची स्थापना : १९४८ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 'सर्व सेवा संघा'ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९६० मध्ये ही जमीन घेण्यात आली होती. येथे विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, लाल बहादूर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ६२ वर्षांपूर्वी सर्व सेवा संघाच्या इमारतीचा पाया रचला गेला. महात्मा गांधींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे आदर्श प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश होता.
हेही वाचा :
- Yogi Adityanath : बुलडोझर हे शांतता आणि विकासाचे प्रतिक असू शकतात - योगी आदित्यनाथ
- MP Urinating Case : आदिवासी तरुणावर लघवी केल्याचे प्रकरण, भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर!
- Yogi Adityanath France Riots : 'योगींना फ्रान्समध्ये पाठवा, ते 24 तासांत..' ; फ्रान्समधील दंगलींवर जर्मन प्राध्यापकाचे ट्विट व्हायरल