पणजी - गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिली. या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडले जाणार आहे. परंतु, याचा कालावधी किती असेल ते निश्चित करण्यात आले नसून याविषयीचा निर्णय विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पर्वरी येथील सचिवालय सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक ठरावांना मंजूर देण्यात आली. ज्यामध्ये कँसिनोना पुढील सहा महिन्यांपर्यंत मांडवीत राहण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण ते कुठे स्थलांतरित करावे याविषयी अद्याप मंत्रीमंडळाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यांपर्यंत ते आहे तेथेच राहतील. तसेच कळंगुट येथे पर्यटन खात्याकडे असलेली पार्किंग जागा स्थानिक पंचायतीला तात्पुरती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तीन डॉक्टरांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने करण्यात आल्या आहेत.
24 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून सुरु होईल. यामध्ये अर्थसंकल्प मांडून मंजूर केला जाईल, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, याची कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय होईल.
दरम्यान, गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेताना या महिन्यात 24 जणांना सरकारी सेवेत सामावून घेतले जाईल. तर उर्वरित 230 जणांना मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून सामावून घेतले जाईल आणि जेथे रिक्त जागा असतील तेथे सामावून घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या.
आजच्या गोवा मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
- 24 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
- पणजीत मांडवीतील तरंगते पुढील कँसिनो सहा महिने आहे तेथेच राहतील
- स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेणार. यामहिन्यात 24 जणांना नियुक्ती पत्र देणार. तर उर्वरित 230 जणांना मनुष्यबळ विकास महामंडळा अंतर्गत सामावून घेणार
- गोवा लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. सुखाजी नाईक यांची नियुक्ती
- धारबांदोडा येथील पदवी महाविद्यालयास जागेस मंजुरी
- मुख्यमंत्री अँपरेटशीप ट्रेनिंग उपक्रमास मान्यता