लखनऊ Mayawati Successor Akash Anand : एकेकाळी बहुजन समाज पार्टीचा (बसपा) उत्तर प्रदेशात मोठा दबदबा होता. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं राज्यात प्रचंड बहुमतानं सत्ता स्थापन केली होती. उत्तर प्रदेशात एकाच पक्षानं एवढं मोठं बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. देशभरात तेव्हा मुख्यमंत्री मायावती यांचीच चर्चा होती. मात्र अवघ्या ५ वर्षांनतर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षानं बसपाचा दारुण पराभव केला आणि राज्यात सत्ता स्थापन केली.
बसपाचा आलेख घसरता : पाच वर्षांनंतर २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगीराज आले. या निवडणुकीत भाजपानं प्रचंड बहुमतानं सत्ता काबीज केली. भारतीय जनता पार्टीचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले. योगी आदित्यनाथ यांनी २०२२ मध्येही आपला जलवा कायम ठेवला आणि सलग दुसऱ्यांदा बहुमतानं सत्तेवर विराजमान झाले. २०१२ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यापासून उत्तर प्रदेशासह देशभरात बसपाचा आलेख घसरत चालला आहे. बसपा हा राष्ट्रीय पक्ष असूनही त्यांच्यावर अडचणीचे ढग दाटून आले आहेत. मायावतींची जादू ओसरत चालली असून, पक्ष हळूहळू देशाच्या राजकारणातून बाद होत चाललाय.
पुतण्याला उत्तराधिकारी घोषित केलं : अशा स्थितीत आता बसपा सुप्रीमो मायावती यांनी मोठा जुगार खेळत रविवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एक मोठी घोषणा केली. मायावतींनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना बहुजन समाज पार्टीचा उत्तराधिकारी घोषित केलं आहे. आता डबघाईला आलेल्या या पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्याची जबाबदारी २८ वर्षीय आकाश आनंद यांच्या खांद्यावर असेल.
आनंद पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक : बसपा सुप्रीमो मायावती यांच्यानंतर त्यांचा पुतण्या आकाश आनंद बहुजन समाज पार्टीचा नेता होणार आहे. लंडनमधून शिक्षण घेतलेल्या आकाश आनंद यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर मायावतींनी त्यांना मोठी जबाबदारी दिली होती. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आलं. त्यांच्याकडे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. आकाश यांनी चांगले निकाल दिले, ज्याचा परिणाम असा झाला की, मायावतींनी आता त्यांना आपला उत्तराधिकारी बनवलं आहे.
२०१९ पासून पक्षात कार्यरत : आकाश आनंद हे मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांचा पुत्र आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मायावतींच्या निवडणूक प्रचार रणनीतीची जबाबदारी घेतली होती. तर २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचं सोशल मीडिया कॅम्पेन हाताळलं होतं. आकाश आनंद यांना २०१९ मध्ये बसपाचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आलं होतं. त्यानंतर मायावती यांनी समाजवादी पक्षासोबतची युती तोडून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले.
राजस्थानमध्ये पक्षाची धुरा सांभाळली : २०२२ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बसपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आनंद यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. याशिवाय विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं कॅडर तयार करण्याचं कामही त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. आकाश आनंद गेल्या वर्षभरापासून राजस्थानमध्ये पक्षाची धुरा सांभाळत आहेत. ते अनेक प्रसंगी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिसले आहेत. याशिवाय आकाश आनंद यांनी पक्षाच्या १४ दिवसांच्या 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय संकल्प यात्रे'चंही नेतृत्व केलं होतं.
हे वाचलंत का :