कांकेर (छत्तीसगड) : छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अमित शहांच्या बस्तर दौऱ्यानंतर नक्षलवादी सातत्याने जवानांवर आपला राग काढत आहेत. विजापूरमध्ये सोमवारी झालेल्या आयईडी स्फोटानंतर आज कांकेरमध्ये आयईडीचा स्फोट झाला. ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. कोयलीबेडा येथील दुडा आणि चिलपारस कॅम्प दरम्यान कागबरस टेकडीजवळ आयईडी स्फोट झाला.
कांकेरमध्ये आयईडी स्फोटात जवान जखमी : कांकेरचे एसपी शलभ कुमार सिन्हा यांनी आयईडी स्फोट झाला असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, बीएसएफचे जवान गस्त घालण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी सीओबी चिलपारा पासून सुमारे अडीच किलोमीटर उत्तरेला आणि सीओबी धुट्टाच्या दक्षिणेला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी एका नाल्यात आयईडी पेरला होता. या स्फोटात बीएसएफचे जवान क्रमांक ११२४३५१२ सीटी सुशील कुमार यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर जखमा झाल्या आहेत. क्र. 12061056 सीटी छोटूराम यांच्या उजव्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. कोयलीबेडा आरोग्य केंद्रात जखमी जवानांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवण्यात आले आहे.
विजापूरमध्ये आयईडी स्फोटात सीएएफ जवान शहीद : विजापूरच्या मिरतूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात सोमवारी एक सीएएफ जवान शहीद झाला होता. रस्ते बांधणीच्या कामासाठी सुरक्षा पुरवण्यासाठी जवान टिमनेर कॅम्पमधून बाहेर पडले होते, तर एटेपल कॅम्पपासून 1 किलोमीटर अंतरावर टेकरी येथे IED स्फोट झाला. शहीद जवान उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी होता.
अमित शाह यांनी दिला होता इशारा : नुकतेच जगदलपूरमध्ये CRPF च्या 84 व्या स्थापना दिनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते. अमित शाह यांनी यावेळी नक्षलवाद्यांना इशारा दिला होता. शाह म्हणाले होते की, नक्षलवाद्यांविरुद्धचा आमचा लढा शेवटच्या टप्प्यावर आहे. सीआरपीएफमुळे नक्षलग्रस्त भागात विकास होत आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सुरक्षा पोकळी संपणार आहे. एनआयए आणि ईडी देखील डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी फंडिंगला रोखण्यासाठी जोरदार कारवाई करत आहेत.