भुवनेश्वर : ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये दोन बोटी उलटून दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील चित्रकोंडा येथे सेलेरू नदीमध्ये ही दुर्घटना घडली. ओडिशा आपत्ती जलद कृती दलाने (ओडीआरएएफ) बचाव आणि शोधकार्य सुरू केले आहे. या बोटींवर ११ कामगार होते, जे कामावरुन परत येत होते अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक बी.व्ही. कृष्णा राव यांनी या अपघाताबाबत माहिती दिली. हे सर्व कामगार हैदराबादमध्ये राहत होते, असे त्यांनी सांगितले. तेलंगणा सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे हे सर्व आपल्या मूळ गावी ओडिशामध्ये परत निघाले होते. यावेळी बोटीतून प्रवास करताना हा अपघात झाला. या अपघातानंतर तीन कामगार पोहून किनाऱ्यावर आले. तर सात जण बेपत्ता आहेत.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यांमधील सुरक्षा पथके या बेपत्ता कामगारांचा शोध घेत आहेत, अशी माहिती राव यांनी दिली.