मुरैना (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात घरामध्ये झालेल्या स्फोटानंतर घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. जिगनी गावात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या स्फोटात एक जोडपे आणि त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर त्यांची इतर दोन मुले हुसेन आणि अली यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील माता बसैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिगनी गावात बुधवारी सकाळी घराचा एक मोठा भाग कोसळला. घराच्या ढिगाऱ्याखाली कुटुंबातील पाच जण सापडले. या अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्यातील एका मुलाचा मृत्यू झाला तर दोन मुले जखमी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. माता बसैया पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश शर्मा यांनी या घटनेविषयी माहिती दिली.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मृत बंटी खान हे फटाक्यांचा अवैध व्यापार करत असत. तसेच, घराच्या आत अवैधरीत्या फटाके बनवले जात होते. त्यादरम्यान स्फोट होऊन घराचा काही भाग कोसळला असावा. यावरून ही दुर्घटना घडण्यामागे फटाक्यांचा स्फोट होण्याचे कारण असू शकते. तर, हा सिलिंडरचा स्फोट असू शकतो, असे काहीजणांचे म्हणणे आहे. हा कोणत्या प्रकारचा स्फोट असावा, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.