बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांचा आलेख वाढतच आहे. देशात कोरोनासोबत आता ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. ब्लॅक फंगसचा प्रकोप थांबता थांबेनासा झाला आहे. कर्नाटकात ब्लॅक फंगसमुळे 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 1 हजार 784 रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्नाटकात 1 हजार 754 ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत. यातील 62 जण बरे झाले आहेत. तर 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 564 जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्री डॉ.के सुधाकर यांनी ही माहिती दिली. ब्लॅक फंगचे रुग्णांना उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. तर पूर्ण बरे होण्यासाठी हे रुग्ण पाच ते सहा आठवडे घेतात.
ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी देशात ऍम्फोटेरेसिन-बी नावाच्या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. सध्या या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ब्लॅक फंगसचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनाप्रमाणे ते लपवता येऊ शकत नाही. कोरोनाची लागण झालेला व्यक्ती घरात इतरांपासून लपून राहू शकतो. मात्र, ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णाला रुग्णालयात जावेच लागते.
'अशी' आहेत आजाराची लक्षणे
रुग्णाच्या चेहऱ्यावर, डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
ब्लॅक फंगसचे स्ट्रेन...
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. याला काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस म्हटले जाते. तर, आता पांढरी बुरशी आणि त्यापाठोपाठ पिवळ्या बुरशीची चर्चा आहे. काळी, पांढरी, पिवळी बुरशी हे म्युकरमायकोसिसचे प्रकार आहेत, स्ट्रेन आहेत. त्यामुळे, रंगांची चर्चा न करता कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या ब्लॅक फंगसला कसे टाळता येईल, याकडे लक्ष देणे गरचेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.