नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनातून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच नाव समोर आले आहे. सध्या हे नाव देशपातळीवर चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी गावाकडे परतले होते. मात्र, राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी आशा मिळाली. सध्या राकेश टिकैत देशभरात शेतकरी पंचायत घेत आहेत. यातच त्यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. यातील एक आरोपी हा एबीव्हीपीचा माजी विद्यार्थी नेता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा हल्ला भाजपाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
अलवरमधील हर्सोली आणि बानसूर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. हर्सोली येथून बानसूरला जात असताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी 14 तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्या सर्वांविरूद्ध 307, 398, 332, 53, 145, 46, 47, 48, 49, 323, 41, 506, 427 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुख्य आरोपी कुलदीप यादव हा मत्स्य विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता आहे. शुक्रवारी तरुणांच्या एका गटाने कुलदीप यादव यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर हल्ला केला. दरम्यान, राकेश टिकैत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याला किसान आंदोलनाच्या मंचावर भाजपाला जबाबदार धरण्यात आले. बानसूरच्या किसान सभेच्या मंचावरुन ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची भूमिका -
शेतकरी आंदोलन बांधून ठेवण्यात राकेश टिकैत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करेल, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला. आता केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील हा संघर्ष कुठपर्यंत जातो, हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे.
हेही वाचा - दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला न्यायालयात केलं हजर; पाच दिवसांची पोलीस कोठडी