लखीमपुर खीरी - उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव देखील घटनास्थळी पोहोचणार आहे.
लखीमपूर खीरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अनेक योजनांचे उद्घाटन केले. त्यानंतर ते केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या बनवीरपूर गावाकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या हेलीपॅडवर कब्जा करून कृषी कायद्यांचा विरोध नोंदवला. यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोन गाडीतून तिकोनिया येथील बनबीरपूर पासून वेगात गेले. दरम्यान याचवेळी यातील भाजपा कार्यकर्त्यांची गाडी शेतकऱ्यांमध्ये शिरली आणि यात अनेत शेतकरी जखमी झाले. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील चालकाला लोकांनी ठार केले आहे.
सुधर जाओ, नही तो सुधार देंगे...
केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांनी 26 सप्टेंबर रोजी एका जाहीर सभेत शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यात ते म्हणाले, सुधर जाओ नहीं तो दो मिनट में सामना करवाके हम आपको सुधरा देंगे. अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. आणि आता या घटनेत त्यांच्याच मुलाचे नाव समोर येत असल्याने अजय मिश्र यांच्यावर टीका होत आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर टाकण्यात आला आहे.