नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) कार्यकर्ते मनीष भानुशाली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मनिष यांनी म्हटले आहे, की मलिक यांच्या वक्तव्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मनिषने सुरक्षेचीही मागणी केली आहे. एनसीपी नेते नवाब मलिक यांनी आज (बुधवार) एका पत्रकार परिषदेत मनिष भानुशाली यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर भानुशाली यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) केलेल्या कारवाईत मी साक्षीदार होतो. त्यासाठी मला एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. मी आणि माझा मित्र के.पी. गोसावी आम्ही दोघेही सोबत होतो. आम्ही कोणत्याही आरोपींना एनसीबी कार्यालयात घेऊन गेलो नाही. उलट आम्ही त्यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात जात होतो. 'कार्डिया क्रुझ'वरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे हे एनसीबीचे अधिकारी नसून, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अरबाज मर्चंटला भाजपाचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली यांनी ताब्यात घेतल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता. भाजपा आणि एनसीबीचे काय कनेक्शन आहे, हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, असा सवालही मलिक यांनी केला होता.
हेही वाचा - Cruise Drug : एनसीबीच्या कारवाईत सहभागी मनिष भानुशाली, के. पी. गोसावी नेमके कोण?