पणजी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा शनिवार आणि रविवार या दोन दिवस गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी गोवा विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी स्वागत केले. गोवा राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची राजकीय रणधुमाळी सुरू झाले आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. यावेळी मात्र कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र दिसले. काही काळ स्वतः जे पी नड्डा यांनी मास्क काढल्याचे यामध्ये दिसून आले.
दाबोलीम विमानतळावर स्वागत
दाबोलीम विमानतळावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व भाजप नेत्यांनी जंगी स्वागत केले. नड्डा या दोन दिवसांत पक्षाच्या आमदार, स्थानिक नेते आणि कोअर कमिटीच्या बैठका घेणार असून, यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविली जाणार आहेत.
असा असेल नड्डा यांचा गोवा दौरा
उद्या रविवारी सकाळी गोव्यातील प्रसिद्ध अशा मंगेशी मंदिरात नड्डा दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते आपल्या पुढील कामाला सुरुवात करणार आहेत. यामध्ये 9.15 वाजता तपोभूमी कुंडई येथील वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहणार. 10.30 वाजता पणजीतील डॉन बॉस्को लसीकरण केंद्राला भेट देणार. त्यानंतर आमदार व कोअर कमिटीसोबत बैठका घेणार आहेत. तर, दुपाली 3.30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.