डेहराडून - उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उत्तराखंडची कमान आता तीरथ सिंह रावत यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी राजीनामा सोपवल्यानंतर आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधिमंडळ गटाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
तीरथसिंह रावत हे भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आहेत. ते फेब्रुवारी 2013 ते डिसेंबर 2015 या काळात उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच चौबट्टाखालचे माजी आमदार (2012-2017) होते. सध्या तीरथसिंह रावत हे भाजपाचे राष्ट्रीय सचिव तसेच गढवाल लोकसभेचे खासदार आहेत. पौरी मतदारसंघातील भाजप उमेदवाराव्यतिरिक्त, त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारीही बनविण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक -
सन 2000 मध्ये, ते नव्याने स्थापना झालेल्या उत्तराखंडचे पहिले शिक्षणमंत्री होते. यानंतर, 2007 मध्ये, त्यांची भारतीय जनता पक्षाकडून उत्तराखंडचे प्रदेश सरचिटणीस, तत्कालीन राज्य निवडणूक अधिकारी आणि राज्य सदस्यता प्रमुख म्हणून निवड झाली. 2013 उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. 2012 मध्ये चौबटाखाल विधानसभेचे आमदार होते. तर 2013 मध्ये उत्तराखंड भाजपा प्रदेशाध्यक्ष झाले. यापूर्वी 1983 ते 1988 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, संघटनेचे मंत्री आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (उत्तराखंड) चे राष्ट्रीय मंत्री होते.
त्रिवेंद्रसिंह रावत यांची गच्छंती -
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. पक्षाने विचार करून सामूहिकरित्या निर्णय घेत, त्यांना पदावरून हटवले. पक्षाचे आमदार रावत यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त होते.
उत्तरांखड विधानसभा संख्याबळ -
70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आता आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होईल. राज्यात सत्तेत येण्यासाठी 21 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.