पाटणा - बिहारमध्ये भाजप आमदारांच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवार पाटण्यामध्ये येणार आहेत. गटनेता निवडीची ही बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात रविवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडनवीस आणि प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल १० नोव्हेबरला जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 74 आमदार निवडून आले आहेत. या निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. अशा परिस्थिती बिहारमध्ये सत्ता स्थापन होण्यापूर्वी सभागृहातील पक्षाचा गटनेता निवडीसाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयातील अटल बिहारी बाजपेयी सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री पद जेडीयूकडे -
बिहार विधानसभा निवडणुकीची धामधुम संपल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यास गेले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने महत्त्वाची खाती आणि विभाग भाजपा मागण्याची शक्यता आहे.
एनडीएतील भाजपाला ७४ तर जनता दल युनायटेड पक्षाला ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच करण्यात येईल असे भाजपाने आधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री पद जेडीयूकडे राहण्याची शक्यता आहे.