केरळ ( त्रिवेंद्रम ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यात आत्मघातकी हल्ल्याचा इशारा देणारे पत्र केरळ भाजप प्रदेश समिती कार्यालयात पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. केरळ पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी धमकीच्या पत्राचा तपास तीव्र केला आहे. जोसेफ जॉन नादुमुथामिल नावाच्या व्यक्तीकडून ते पाठवण्यात आले, जो मूळचा एर्नाकुलमचा आहे. आठवडाभरापूर्वी भाजपच्या प्रदेश समितीच्या कार्यालयात हे पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मोदी केरळच्या दौऱ्यावर जाणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी ५ वाजता केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. केरळमधील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यासह त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातून हवाई दलाच्या विशेष विमानाने राज्यात येणार आहेत. साडेपाचपर्यंत ते भाजपच्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते थेवरा सेक्रेड हार्ट कॉलेज मैदानावर भाजपच्या नेतृत्वाखालील युवा संघटनांनी आयोजित केलेल्या युवम या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा : पंतप्रधान ताज मलबार हॉटेलमध्ये रात्री विश्रांती घेणार आहेत. मंगळवारी सकाळी 9.25 वाजता कोचीहून विमानाने ते तिरुअनंतपुरम विमानतळावर सकाळी 10.15 वाजता पोहोचणार आहेत. तेथे सकाळी 10.30 वाजता ते मध्य रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता सेंट्रल स्टेडियमवर जाहीर सभेला संबोधित करतील. मोदी चार रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, टेक्नो सिटीची पायाभरणी आणि कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन देखील करणार आहेत. दुपारी 12.40 वाजता ते सुरतला रवाना होणार आहेत.
धमकीच्या पत्राचा तपास सुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी केरळ दौऱ्यापूर्वी सुरक्षतेची चिंता वाढली आहे. एडीजीपी इंटेलिजन्सने तयार केलेला सुरक्षा आराखडा लीक झाला होता. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यानच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची माहितीही लीक झाली होती. हा ४९ पानांचा अहवाल होता, ज्यात व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत सर्वसमावेशक माहिती होती. पंतप्रधान ज्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत, त्या जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाच हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यानंतर अधिकाऱ्यांनी आवश्यक ते बदल करून नवीन सुरक्षा योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केरळ पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हत्येच्या धमकीच्या पत्राचा कसून तपास करत आहेत.