पाटणा - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना भाजपाने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी बिहारमधून उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यांच्याजागी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता सुशील कुमार मोदी यांना खासदार पदाची ऑफर मिळाली आहे.
सुशील कुमार मोदींचे जुने ट्विट, डावलल्याची सुशील कुमारांना खंत
'भाजप आणि संघपरिवाराने मागील ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मला जेवढं दिलं तेवढ कदाचित दुसऱ्या एखाद्याला मिळालं असेल. यापुढेही जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेल. कार्यकर्त्याचे पद तर कोणी हिरावू शकत नाही', असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद काढून घेतले असले तरी कार्यकर्त्याचे पद कोणी काढून घेऊ शकत नाही, असे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सूचित केले आहे.
राज्यसभेवर निवडून गेल्यास त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री पद मिळावे, यासाठी मोदी इच्छुक होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने बिहारमधील भाजपाच्या नेतृत्त्वात मोठे बदल केले. इतर नेत्यांची नाराजी ओढवू नये म्हणून मोदींना उपमुख्यमंत्री पदावरून दुर केले. त्यांच्याजागी दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड केली. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्याने स्थानिक नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बिहारमध्ये सत्ता स्थापनेवळी त्याची झलक पाहायला मिळाली.