बिकानेर (राजस्थान) - बिकानेरला छोटी काशी असे म्हणतात. बिकानेरमध्ये जेवढे गल्ल्या आहेत तेवढीच मंदिरे आहेत असेही म्हटले जाते. येथील अनेक मंदिरांच्या स्थापनेशी संबंधित अनेक ऐतिहासिक तथ्ये आहेत. या मंदिरांपैकीच एक म्हणजे कोडमदेसर भैरव मंदिर. (Bikaner Kodamdesar Bhairav Temple). या मंदिराशी निगडीत अनेक श्रद्धा आणि दंतकथा आहेत.
मंदिर बिकानेरच्या स्थापनेपूर्वीचे - भगवान भैरवनाथांना काशीचा रखवाल म्हणतात. बिकानेरमधील कोडमदेसर भैरव मंदिराच्या स्थापनेशी संबंधित तथ्यांवर आधारित पुस्तकानुसार, काशीनंतर भगवान भैरवनाथाचे दुसरे मंदिर मंडोर, जोधपूर येथे स्थापित केले गेले. येथे त्यांचे दोन भक्त सुरोजी आणि देडोजी हे बागायतदार होते आणि काही प्रसंगामुळे ते मंडोर सोडून गेले. त्यांनी आपले प्रमुख दैवत भगवान भैरवनाथ यांनाही आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्यावर भगवान भैरवनाथ त्यांच्यासोबत चालण्यास तयार झाले आणि म्हणाले की, जिथे तू मागे वळून मला पाहशील, मी तिथेच थांबेन. असे सांगितले जाते की बिकानेरमधील सध्याच्या कोडमदेसरजवळ बाबा भैरवनाथ सोबत आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्या दोघांनी मागे वळून पाहिले. त्याच्या मागे वळून बघितल्यावर भगवान भैरवनाथांची तिथेच स्थापना झाली आणि तेव्हापासून त्यांची पूजा तिथे सुरू झाली. हे मंदिर बिकानेरच्या स्थापनेपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.
बाबा भैरवनाथ उघड्यावरच विराजमान आहेत - हे मंदिर खूप उंच असून संपूर्ण संगमरवरी दगडाने बनविलेले आहे. परंतु आश्चऱ्याचे म्हणजे या मंदिरावर कुठलेही छप्पर नाही! महाराष्ट्रातील शनी शिंगणापूरमध्ये ज्याप्रमाणे शनी देव आकाशाखाली विराजमान आहेत, त्याचप्रमाणे येथे देखील भैरवनाथ आकाशाखालीच विराजमान आहेत. मंदिरात रोज पूजा केली जात असली तरी नवस पूर्ण झाल्यामुळे लोक दूरदूरवरून येथे पूजा करण्यासाठी येतात आणि अष्टमी चतुर्दशी आणि अमावस्येला विशेष श्रृंगार करतात.
राजघराण्याचीही मंदिरावर श्रद्धा - सूरजजी हे पुष्करणा ब्राह्मण समाजातील सूरदासनी पुरोहित जातीचे होते आणि त्यांचे वंशज रोडा महाराज म्हणतात की, कोडमदेसर हे नाव क्षत्रिय राजकन्या कोडमडे हिच्या नावावरून पडले आहे. ती भैरवजींची नित्य पूजा करत असे. सध्याच्या मंदिरात देडो जी माळी यांचे वंशज पूजा करतात. बिकानेरच्या राजघराण्याचीही मंदिरावर नितांत श्रद्धा आहे आणि फार पूर्वीपासून राजघराण्यातील सदस्य येथे प्रार्थना करण्यासाठी येतात.