कटिहार (बिहार) : बिहारच्या कटिहारमध्ये पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी : कटिहार जिल्ह्यातील बारसोई येथील एसडीओ कार्यालयाजवळ वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन चालू होते. दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांच्या गोळीबारात बसल गावातील खुर्शीद आलम (वय ३४ वर्षे), चापाखोड येथील नियाज आलम (वय 32 वर्ष) व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे : स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, तीन वाजण्याच्या सुमारास ते वीज विभागाच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यांनी आरोप केला की, 5 जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी तीन लोकांचा मृत्यू झाला. देखभालीच्या कामामुळे पहाटे 5 ते 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी बास्तोल चौक आणि प्राणपूरच्या बारसोई ब्लॉक मुख्यालयाजवळ मुख्य रस्ता अडवला होता.
चौकशीचे आदेश दिले : या प्रकरणी, एसपी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, हा गोळीबार कसा झाला? याचे आदेश कोणी दिले होते?, याची चौकशी केली जाईल. कटिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांवर झालेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेवर भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की, कटिहारमध्ये नितीश कुमारांच्या पोलिसांनी गोळ्या झाडून सर्वसामान्यांना मारले. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.
हेही वाचा :