गुजरात - भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.
हेही वाचा - मेडिसिन फ्रॉम द स्काय : तेलंगाणात ड्रोनद्वारे दुर्गम भागात औषधं डिलिव्हरीची सेवा सुरू
भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांची निवड झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी केली. भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे गुजरात प्रभारी तोमर यांनी सांगितले. पटेल लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती देखील तोमर यांनी दिली.
कालच विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिला होता. त्यानंतर, भाजप मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आज पटेल यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली.
भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि जोशी यांना नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. ते आज सकाळी गुजरातला आले आणि त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.
कोण आहेत भूपेंद्र पटेल ?
भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पटेल हे 1 लाख 17 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही राहिले आहेत. याव्यतिरिक्त ते अहमदाबाद महापालिकेचे चेयरमन देखील राहिले आहेत. पटेल समजातही त्यांच्या दबदबा आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने अगोदर विजय रुपाणी यांची गच्छंती कशामुळे?