भोपाळ - काँग्रेसशी बंडखोरी करुन खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यातील सत्ता भाजापाच्या झोळीत टाकली. कित्येक वर्ष काँग्रेससाठी काम केल्यानंतर भाजपात जाऊन सिंधिया यांच्या हाती काय लागले असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सिंधिया प्रदेशात आणि पक्षात दबदबा निर्माण करण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचीही सिंधिया भेट घेणार आहेत. तसेच संघटनेतील इतर पदधिकाऱ्यांची ते भेट घेतील.
काँग्रेसला रामराम ठोकून सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाकडून सिंधिया यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या समर्थकांना राज्य मंत्रिमंडळात जागा दिली. मात्र, यापेक्षा जास्त प्राप्त करण्याची सिंधिया यांची इच्छा होती. राज्यात भाजपाची सत्ता फक्त सिंधिया यांनी काँग्रेसशी केलेल्या बंडखोरीमुळे आहे. त्यामुळे त्यांचा हा राज्य दौरा अनेक प्रश्न उभे करणारा आहे. तर सिंधिया यांचा हा रुटीन दौरा असल्याची प्रतिक्रिया त्यांचे निकटवर्तीय महेंद्र सिंह सिसोदिया यांनी दिली.
नरेंद्र सिंह तोमर, प्रभात झा, बीडी शर्मा आणि संघटन पदधिकाऱ्यांची पटेल बंगल्यावर बैठकीची चर्चा आहे. ग्वाल्हेर चंबलमध्ये सिंधिया यांच्या समर्थकांना जागा देण्यात येऊ शकते. सिंधिया याचे पद वाढल्यास नरेंद्र सिंह तोमर आणि प्रभात झा यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. सिंधिया यांचा आपल्या मतदारसंघात जास्त प्रभाव पडू नये, अशी नरेंद्र सिंह तोमर यांची इच्छा आहे. मुरैना हा केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मतदारसंघ आहे.
मार्च 2020 मध्ये सिंधिया समर्थकांचा भाजपात प्रवेश -
काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर मार्च 2020 मध्ये सिंधिया समर्थक असलेल्या काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने कमलनाथ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तर काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.