पाटणा : सुप्रसिद्ध लोकगायिकेवर कार्यक्रमादरम्यान गोळी झाडल्याने गायिका गंभीर जखमी झाली आहे. या गायिकेवर पाटणा येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निशा उपाध्याय असे त्या गोळीबारात जखमी झालेल्या लोकगायिकेचे नाव आहे. ही घटना बिहारमधील सारण जिल्ह्यात घडली आहे. लोकगायिकेवर गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
निशाच्या भोजपुरी गाण्यांचे अनेकांना वेड : प्रसिद्ध लोकगायिका निशा उपाध्याय या बिहारमधील सारण जिल्ह्यातील गारखा ब्लॉकमधील गौहर बसंत येथील आहेत. त्यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडण्यात आली आहे. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने उपचारासाठी पाटणा येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्यायने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी आणि नाव कमावले आहे. त्यांच्या भोजपुरी गाण्यांचे अनेकांना वेड लागले आहे.
कार्यक्रमादरम्यान गायिका जखमी : निशा उपाध्याय एका कार्यक्रमात गाण्याचे सादरीकरण करत होत्या. दरम्यान, काही माथेफिरुंनी तेथे गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक गोळी त्यांच्या पायाला लागली. गोळी लागल्याने निशा या जागीच पडल्या. यानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला. त्याचवेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मॅक्स रुग्णालयात दाखल केले. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली, त्यानंतर कुटुंबीयांनीही पाटणा येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
पोलिसांनी सुरू केला गोळीबाराचा तपास : गायिकेवर गोळीबाराच्या या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. निशा यांच्या ओळखीच्या अनेकांनी त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पाटण्यातील मॅक्स हॉस्पिटल गाठले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान काही नागरिक नृत्य करताना गोळीबार करत असताना ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर गोळीबार करणारे संशयित तेथून पसार झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच गारखा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबाराच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा -