नवी दिल्ली - नागपूर खंडपीठाने नुकताच दिलेला एक निर्णय वादग्रस्त ठरला होता. वादंग उठताच सर्वोच्च न्यायलायने ह्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र, हा देणाऱ्या न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांना काढून टाकण्याची विनंती १३ वर्षीय झेन सदावर्ते या मुलीने केली आहे. आठवीत असणाऱ्या झेन हिने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहले आहे.
नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त निकाल काय आहे?
12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपूर खंडपीठाने एक वादग्रस्त निकाल दिला होता. अल्पवयीन मुलीच्या अवयवांना कपड्यांवरून स्पर्श केल्यास हे कृत्य पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार ठरणार नाही, तर फक्त विनयभंग ठरेल, असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 39 वर्षीय व्यक्तीने 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आरोपीला शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण, याबाबत आरोपीच्या वकीलाने नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी निरीक्षण नोंदवले. प्रत्यक्ष त्वचेला स्पर्श न करता कपड्यावरून स्पर्श केल्याच्या कृत्यास लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले होते.
झेन सदावर्ते बालशौर्य पुरस्कार विजेती -
झेन सदावर्ते ही १३ वर्षाची मुलगी मुंबईतील परळ भागातील असून वकील गुणरत्ने सदावर्ते यांची मुलगी आहे. तिला २०१९ चा बालशौर्य पुरस्कार मिळाला आहे. इमारतीत आग लागून झालेल्या घटनेत झेन सदावर्ते हीने 17 जणांचे प्राण वाचविले होते. झेन आत्तापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत असून बाल हक्कांसाठी काम करते. माध्यान्य भोजन, तृतीयपंथीयांचे हक्क आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरही ती आवाज उठवत आहे.
गनेडीवाला यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याचे अनेक स्तरातून पडसाद उमटले होते. हा निकाल लाजीरवाणा, बालकांच्या आत्मसन्मानाविरोधातील आहे. राज्यघटनेने २१ व्या कलमाअंतर्गत दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचे त्याने सरन्यायाधीशांना लिहलेल्या पत्रात झेन सदावर्ते हिने म्हटले आहे.