नवी दिल्ली - देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, आता उन्हाळा सुरू झाला असून काही भागात आतापासून पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील बोकारो येथील तरुणांनी विहिर खोदण्याचे कार्य हाती घेतले आहे.
परिसरातील पाण्याचे संकट सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांनी विहिर खोदण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांनी रमजानच्या या महिन्यात विहिरी खोदण्यास सुरवात केली, या उपक्रमाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. ईदनिमित्त लोकांना ही विहिरी भेट देण्याचेही तरुणांनी ठरविले आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करत तरुणांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला.
यापूर्वी महाराष्ट्रातील मानोरा तालुक्याच्या कारखेडा येथील एका दाम्पत्याने अंगणात चक्क २५ फूट विहीर खोदण्याची किमया केली. हे काम २१ दिवसात त्यांनी पूर्ण केले होते. तसेच कर्नाटकातील बेलथांगडी तालुक्यातील मिठाबागीलु गावात सहा मुलांनी पिण्याच्या पाण्यासाठी चार दिवसात 12 फूट विहीर खोदली होती.