आग्रा - ब्लू व्हेल या गेमनंतर, आता 'पब्जी' या मोबाईल गेममुळे अनेकांचा जीव जात असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सुवर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या युवकाचाही यामुळेच मृत्यू झाला. पब्जी खेळण्यात व्यग्र असल्यामुळे, पाण्याऐवजी चुकून केमिकल प्यायल्यामुळे, सौरभ यादव या तरूणाला आपला जीव गमवावा लागला.
ग्वाल्हेरचे रहिवासी असलेले संतोष शर्मा आणि सौरभ यादव हे दोघे आग्र्याला निघाले होते. सराफ काम करणारे हे तरुण, आग्र्याच्या सर्राफ बाजारातून काही सामान खरेदी करण्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान विरंगुळा म्हणून सौरभ पब्जी खेळत होता. यावेळी मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे, आपण काय पित आहोत हे सौरभला समजले नाही. पाण्याऐवजी केमिकल प्यायल्यामुळे, सौरभचा जागीच मृत्यू झाला.
आग्रा कँट स्थानकावर जेव्हा ही गाडी थांबली, तेव्हा सौरभच्या मित्राने जीआरपीला याबाबतची माहिती दिली. जीआरपीने, मृतदेह आणि केमिकल ताब्यात घेऊन सौरभच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. पोलिस निरिक्षक विजय सिंह यांच्या निर्देशामध्ये पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : टाकाऊ प्लास्टिक द्या अन् अंडी, मिठाई घेऊन जा, आंध्रमधील महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम