ग्वाल्हेर - ..असे म्हटले जाते की, तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर, संकटेही तुमच्यासमोर खुजी वाटतात. असेच काहीसे करून दाखवले आहे झारखंडमध्ये राहणाऱ्या धनंजय माझी यांनी.. त्यांनी त्यांच्या पत्नीला परीक्षेसाठी नेण्यासाठी झारखंडपासून ग्वाल्हेरपर्यंतचा तब्बल 1 हजार 150 किलोमीटरचा प्रवास स्कूटीवरून केला.
झारखंडचे रहिवासी असलेल्या धनंजय माझी यांची पत्नी सोनी डीएडच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बस-सुविधा सध्या बंद आहे. विमानाचे भाडे पडवडणारे नव्हते. तर, ट्रेन रद्द झाली होती. अशा परिस्थितीत धनंजय यांनी त्यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला स्कूटीवरूनच ग्वाल्हेरला घेऊन जाण्याच्या निर्णय घेतला. त्यांनी स्कूटीवरून जवळजवळ 1 हजार 150 किलोमीटरचा प्रवास केला.
बसचे प्रवासी भाडे जास्त होते
लॉकडाऊनआधी आपण गुजरातमध्ये स्वयंपाक्याचे काम करत असल्याचे धनंजय यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गेली. तेव्हापासून ते घरीच आहेत. पत्नी सोनी यांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी बसने ग्वाल्हेरला जाण्याचा विचार केला. बसवाल्यांशी संपर्क केला असता त्यांनी एका व्यक्तीचे भाडे 15 हजार रुपये सांगितले. इतके पैसे देणे शक्य नसल्याने त्यांनी रेल्वेचे तिकिट बुक केले. मात्र, ऐन वेळी त्यांची ट्रेनही रद्द झाली.
पत्नीला शिक्षिका बनवण्याचे स्वप्न
धनंजय यांच्या पत्नीची परीक्षा देऊन शिक्षक बनण्याची इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धनंजय यांनी त्यांना स्कूटीवरून ग्वाल्हेरला जाण्याचा विचार केला. मात्र, त्यातही आर्थिक अडचणी होत्या. रस्त्याने जाण्यासाठी लागणारे पेट्रोल आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या पत्नीने आपले दागिने गहाण ठेवले. आता ते ग्वाल्हेरला येऊन पोहोचले आहेत. येथे ते भाड्याने खोली घेऊन राहात आहेत. धनंजय यांच्या हिमतीचे आणि पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचे सर्वांकडून जोरदार कौतुक होत आहे.