वाराणसी (उत्तर प्रदेश) - कोरोनाविरोधातील लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस महत्वाची भूमिका बजावत आहेत. या कठीण परिस्थितीतही अनेक जण मेक इन इंडीयाद्वारे त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. अशातच मवइया सारनाथ येथील उदय सिंह यांनी फक्त ६० रुपयांत जुने आणि नवे एक्सरेंपासून फेस स्क्रीन कव्हर तयार केले आहे. या कव्हरचा वापर अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि टेक्निशियन करत आहेत.
उदय सिंग सांगतात, की मी माझ्या घरात पडून असलेल्या जुन्या, नव्या एक्स रे शीटचा वापर करुन त्यात एक चश्मा बसवला आणि फेस कव्हर तयार केले. विविध साहित्यापासून जुगाड करुन तयार केलेले हे कव्हर मेडीकल स्टाफसाठी खूप चांगले आहे. याची किंमत फक्त ६० रुपये आहे. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला ही किंमत परवडणारी आहे.
टेक्निशियन उदयने कमी साधनांमध्ये वापरण्यायोग्य चांगली वस्तू कशी बनवता येईल, यासाठी प्रयत्न केले. एके दिवशी एक्स रे काढत असताना मलाच असुरक्षित असल्यासारखे वाटले. कारण मला एक्स रे काढण्यासाठी रुग्णांच्या फार जवळ जावे लागते. फेस मास्क आणि डोक्यावर कव्हर असले तरी शिंकल्यास किंवा खोकल्यास त्याचे शिंतोडे माझ्यापर्यंत येऊ शकतात. त्यामुळे मी हे कव्हर बनविण्याचा प्रयत्न केला, असे उदय सांगतात.
हे कव्हर तुम्ही घरीही बनवू शकता. यासाठी एक प्लेन एक्स रे शीट घ्या. त्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी स्वच्छ हात धुवून त्याला धुवून घ्या. डोळ्यांजवळ माप घेऊन थोडे कापून घ्या. त्यात चश्मा टाकून दुसरा कट लावा आणि चश्मा फिट करून घ्या, अशाप्रकारे हे कव्हर बनविण्याची प्रक्रिया उदयने सर्वांना सांगितली आहे.