भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, साध्वीने जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरला शाप दिला असता, तर भाजप सरकारला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.
भोपाळच्या अशोक गार्डन येथील प्रचार रॅली दरम्यान दिग्विजय सिंह बोलत होते. ते म्हणाले, साध्वीने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना शाप दिला. त्यांच्या शापामुळे दहशतवाद्यांनी त्यांना मारले, असे सांगितले. ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्यांच्याविषयी यांनी असे वक्तव्य केले. साध्वीच्या शापाने लोक मरत असते तर सरकारला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची काय गरज होती. त्यापेक्षा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला शाप दिला असता, तर भाजप सरकारला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.
यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवरही टीका केली. आपल्या सर्वांना माहित आहे की, गुगलवर फेकू असा शब्द टाईप केल्यानंतर कोणाचा फोटो येतो, असे ते म्हणाले.