मुंबई - ‘जगातील एकमेव मोठा पुरवठादार म्हणून बाजारपेठेचे चीनवरील अवलंबित्व कोरोना विषाणूनंतरच्या काळात कमी होईल. ही भारतासाठी एक संधी आहे,’ असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गुरुवारी म्हटले. कोविड-19 च्या प्रसाराचा धोका असल्याने त्यांनी टीसीएसच्या सर्वसाधारण बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
टीसीएस ही 110 अब्ज डॉलर्सच्या टाटा ग्रुपमधील अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे. जगातील संपूर्ण तंत्रज्ञान घरातून काम करण्याच्या पद्धतीकडे वळत आहे. लोकांच्या या कलाकडे देशातील ही सर्वांत मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी विशेष लक्ष देणार आहे, असे ते म्हणाले. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीचे उत्पत्तीस्थान चीन आहे. मात्र, यामुळे जगभरातील कंपन्या चीनच्या पुरवठादार साखळीवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करतील. सोबतच, जग एका बाजारपेठेवर अवलंबून नाही, हे वारंवार निर्माण होणाऱ्या व्यापारी तणावांमधून सिद्ध होत आहे.
ही संधी आता आपल्याला उपलब्ध आहे. हा केवळ एका बदलाचा प्रश्न नाही तर एका बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी होण्याचे दिवस आहेत. भारताला निश्चितच यात भाग घेण्याची संधी मिळेल," असे चंद्रशेखरन यांनी भागधारकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
बरेच भागधारक घरातून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) फायद्यांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यावर चंद्रशेखरन म्हणाले की, कोरोनानंतरच्या काळातही घरातून मोठ्या संख्येने काम करणारे लोक दिसतील.