हैदराबाद : १४ सप्टेंबर हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी. हिंदी भाषा देशाच्या विविध राज्यांमधील लोकांना एकमेकांशी जोडून ठेवते. यावर्षीच्या हिंदी दिनानिमित्त, जाणून घेऊया हिंदीविषयी काही विशेष बाबी...
१४ सप्टेंबर...
१४ सप्टेंबर १९४९ला देशाच्या संविधान सभेने हिंदी ही संसदीय कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळेच १४ सप्टेंबर हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १९५३ साली पहिला हिंदी दिन साजरा करण्यात आला होता.
राष्ट्रभाषा नाही हिंदी..
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आले आहे. मात्र, हिंदी ही अधिकृतरित्या देशाची राष्ट्रभाषा नाही. स्वातंत्र्यावेळी देशाची एक भाषा असावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा करण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, ईशान्य भारत आणि दाक्षिणात्य राज्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
हिंदी विषयी काही विशेष बाबी...
- मँड्रिन, इंग्लिश आणि स्पॅनिश या भाषांनंतर जगात चौथ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी. जगातील सुमारे २५० दशलक्ष लोक हिंदी भाषा बोलतात. २०११च्या आकडेवारीनुसार, भारतातील ४६ टक्के लोक हिंदीभाषिक आहेत.
- भारताबाहेर नेपाळ, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, न्यूझीलंड, युएई, युगांडा, ग्याना, त्रिनिदाद, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात हिंदी बोलली जाते.
- वेब यूआरएल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सात भारतीय भाषांमध्ये हिंदीचाही समावेश होतो.
- ऑक्सफोर्डच्या इंग्रजी शब्दकोशामध्ये हिंदीतील बऱ्याच शब्दांचा समावेश आहे. यामध्ये यार, पक्का, जुगाड, बिंदी आणि सूर्यनमस्कार अशा शब्दांचा समावेश आहे.
- महात्मा गांधीजींनी हिंदी ही लोकांची भाषा आहे असे म्हटले होते.
- १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये पहिल्यांदाच अटल बिहारी वाजपेयींनी हिंदीमध्ये भाषण केले होते.
- जगभरात हिंदीतील सर्वाधिक वापरला जाणारा शब्द म्हणजे, 'नमस्ते'!
- विशेष म्हणजे, 'हिंदी' हा शब्द मूळचा पर्शियन भाषेतील आहे.
- हिंदीतील पहिली कविता प्रख्यात कवी आमीर खुसरो यांनी लिहिली होती.
- हरयाणवी, ब्रज, अवधी, भोजपुरी, बुंदेली, बाघेली, कन्नौजी आणि राजस्थानी या भाषांना स्वतःचे स्वतंत्र व्याकरण आणि मांडणी आहे. तरीही या भाषा हिंदीच्याच उपभाषा समजल्या जातात.