नवी दिल्ली - 'या आठवड्यात समोर आलेल्या कोविड -19 रुग्णांच्या संख्येने भयंकर टप्पा गाठला आहे. हे संपूर्ण जगावर आलेले संकट असून याचा एकत्र येऊन सामना करणे आवश्यक आहे.' असे जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी म्हटले आहे. तसेच, जगातील सर्व देशांना एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोविड -19 आणि भविष्यातील सार्वजनिक आरोग्याच्या संकटाचा परिणाम हाताळण्यासाठी आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण आवश्यक आहे. नागरिकांच्या हालचाली, रोगप्रसाराचे वेगवेगळे टप्पे आणि आरोग्य देखरेखीशी संबंधित मोठ्या आकडेवारीचे विश्लेषण केल्याने याचा साथीच्या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
अहवालानुसार, अद्ययावत डेटा, आजाराच्या प्रसाराचे विविध टप्पे, मोठ्या लोकसंख्येच्या जीवावर बेतलेले संकट आणि त्याचे वर्गीकरण याच्याशी संबंधित वेळापत्रकांचे प्रमाण निश्चित करणे फारच अवघड आहे.
सध्या 180 हून अधिक देश आणि प्रांतांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आणि जगभरातील प्रकरणांची संख्या 8 लाख 70 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. एखाद्या मोठ्या घोंगावणाऱ्या वादळाप्रमाणेच हे संकट अतिशय धोकादायक बनले आहे. याचा केवळ आरोग्य-काळजी प्रणालींवरच परिणाम होणार नाही तर, बाल-संगोपन, शिक्षण, रोजगार आणि वाहतुकीसह अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण व्यवस्थाच कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.