नवी दिल्ली- शहरी भागातील वृक्षांचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘नगर वन अभियान’ सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘निसर्ग आणि जैवविविधता’ या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. देशातील 200 महानगरपालिका आणि शहरांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन जावडेकर यांनी केले.
आपली जीवनशैली निसर्गाशी निगडित आहे. ग्रामीण भागात वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्या तुलनेत शहरी भागात वृक्षांची संख्या कमी आहे. यामुळे नगर वन अभियान उपक्रम सुरू करत असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन नगर वन अभियानाला लोकांची चळवळ बनवावे. या अभियानात उत्तम कामगिरी करणाऱ्याना आम्ही पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. शहरातील वृक्षांचे प्रमाण वाढल्यास त्याचा फायदा होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी यावर्षी देशात 145 कोटी रोपांचे वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले. वृक्षारोपण हा महत्त्वाचा टप्पा आहे. आपण वृक्षांचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित स्वरूपात करण्याची शपथ घेऊया, असे सुप्रियो म्हणाले.
पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल पृथ्वी आणि निसर्गाकडून मिळत असणार्या संकेताकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे सुप्रियो यांनी सांगितले. आपण सर्वांनी निसर्गाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून प्रयत्न केल्यास आपले लक्ष प्राप्त करता येईल, असे मत त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.