रायपूर - महिला कमांडोंनी बालोद जिल्ह्यात कोरोनाबाबत जगजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबत देखील धडे दिले जात आहे. 'कोरोना की जंग, महिला कमांडो के संग, जितेंगे हम', अशी घोषणा देवून जनतेला कोरोना संसर्गाबाबत जागरूक केले जात आहे.
सर्व कमांडो जास्तीत जास्त ग्रामीण भागात काम करत आहेत. तसेच या कार्यासाठी या महिला जिल्हा प्रशासनाच्या मदतीने जास्तीत जास्त गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील चारशे गावांमध्ये जवळपास १२ हजार ५०० महिला कमांडो कार्यरत आहेत. कोरोनाबाबत जगजागृती करण्याबरोबरच त्या गरीबांना मदत आणि गरजू व्यक्तींना धान्य आणि पैसा पुरवत आहेत. तसेच त्यांना आतापर्यंत १० क्विंटल तांदूळ जिल्हा प्रशासनाच्या 'अनाज बँक'ला दिले आहे. तसेच गावातील धनदांडग्या लोकांकडून त्यांनी ५ हजार ते १० हजार रुपये जमा करून जिल्हा प्रशासनाच्या साहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे, असे सामाजिक कार्यासाठी २०१२ मध्ये पद्मश्री मिळालेल्या शामशाद बेगम यांनी सांगितले.
इतकेच नाहीतर पोलीस प्रशासनालाही या महिलांतर्फे मदत केली जात आहे. जवळपास २०० महिला कमांडो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करत आहेत. तसेच राज्यातील इतर १२ जिल्ह्यांमध्ये देखील ५०, ००० महिला कमांडो कार्यरत आहेत. सर्वजण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत करत आहेत. मात्र, आमची बालोदला जास्त प्राथमिकता असल्याचे बेगम यांनी सांगितले.
सर्व महिला कमांडो त्यांचे घरकाम आटोपून जिल्हा प्रशासनाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करत असतात. तसेच त्यांनी गरजूंना मदत करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या 'अनाज बँक'ला धान्य देखील पुरवले असल्याचे जिल्हाधिकारी राणू साहू यांनी सांगितले.