नवी दिल्ली : गुरुग्राममधील एका ६० वर्षीय व्यक्तीला लुबाडल्याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. अमेरिकी लष्कराच्या दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी असल्याचे सांगत या महिलेने वृद्धाकडून तब्बल १.२४ कोटी रुपये उकळले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरेंद्र कुमार असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. कुमार यांना पूनम माकेला नावाच्या एका महिलेचा व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. यामध्ये तिने आपण दहशतवादी विरोधी पथकामध्ये काम करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने सांगितले, की तिला भारतात एक औषधनिर्माण कंपनी सुरू करायची आहे, ज्यासाठी ती सुमारे ८.७ दशलक्ष डॉलर्स कुमार यांना पाठवेल. त्यानंतर १९ जून ते १७ जुलैपर्यंत कुमार यांना कित्येक वेळा फोन आले, ज्यामध्ये कोणी कस्टम ऑफिसर असल्याचे सांगत, कुमार यांचे अमेरिकेहून पार्सल आल्याचे त्यांना सांगत होता.
हा बॉक्स मिळवण्यासाठी पैसे भरण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे कुमार यांनी ऑनलाईन पैसे भरले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुमार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू झाला, ज्यामध्ये एका महिलेला अटक करण्यता आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन यांनी दिली.
हेही वाचा : NEET : परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या; पेपर देण्याआधीच उचलले पाऊल