बंगळुरू (कर्नाटक) - सलग दोन आठवड्यांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बंगळुरूच्या अनेक भागांत पूर आला. मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या कालावधीनंतरही ऑक्टोबरमध्ये सुरूच राहिलेल्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून शहरात सामान्यहून अधिक पाऊस पडला आहे. यामुळे सांडपाण्याचे नाले भरून वाहिले, रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले. अनेक भागातील गरीब, सामान्य लोकांची घरे पडली. अनेकांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे.
शहरातील बन्नेरघाटा येथे मुसळधार पाऊस पडत असताना लक्कसंद्र झोपडपट्टीतील 71 वर्षीय रश्मी अम्मा यांचे घर कोसळले. त्या दहा बाय दहाच्या घरात त्यांची मुलगी, सून आणि चार नातवंडे यांच्यासह राहात होत्या. त्यांच्यावर आता विल्सन बागेत सार्वजनिक शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. पावसाने त्यांचे घर उद्ध्वस्त केले. घरातील किराणा सामानासह बर्याच वस्तू वाहून गेल्या.
रश्मी अम्मा कल्याण मंटप (विवाह कार्यालय) मध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. त्यांची मुलगी गीता हिनेही तशीच नोकरी धरली होती. पण कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे अलीकडे दोघींचेही काम सुटले होते.
रश्मी अम्मा यांनी अखेरचा श्वास घेतला
राहत्या घराची वाताहात झाल्याने रश्मी अम्मा यांचे कुटुंब सार्वजनिक शौचालयात रहावयास गेले. नंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्या कुटुंबास मदत करण्यासाठी संपर्क साधला. त्याला भेटल्यानंतर रश्मी अम्मा यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ओक्साबोक्शी रडण्यास सुरुवात केली. यादरम्यानच त्या कोसळल्या आणि त्यांची शुद्ध हरपली. त्यांची मुलगी गीता आणि सामाजिक कार्यकर्त्याने रश्मी अम्माला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, रश्मी अम्मा आता या जगात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अखेर गीताने मुलांसह सार्वजनिक शौचालयात राहण्याची मिळवली परवानगी
रश्मी अम्मांची मुलगी गीता अजूनही त्यांच्या चार मुलांसह विल्सन गार्डनच्या सार्वजनिक शौचालयात राहत आहे. गीताला सध्या आई गमावल्याचे दुःख तर आहेच, पण घर गेल्याचे, पोटापाण्याचे साधन नसल्याच्या स्थितीशीही त्या सामना करत आहेत. त्यांची मुले सध्या 4 ते 11 दरम्यानच्या वयोगटातील आहेत. मदतीसाठी गीता यांनी विविध शासकीय कार्यालयांसह निवारा मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणी चकरा मारल्या. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. म्हणूनच अखेर त्यांनी नाईलाजाने बीबीएमपीकडून मुलांसह शौचालयात राहण्याची परवानगी मिळवली.