रायपूर - भिलाईच्या एसीसी जामूलमध्ये एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करून फाशी घेतल्याची घटना घडली. एकाचवेळी तीन जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
जामूल पोलीस ठाण्याच्या एसीसी कॉलनीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. एका आईने आधी आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला. यानंतर आपल्या 11 वर्षांच्या मुलाला फाशी दिली. मग स्वतःही गळफास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्यांनी संबंधित घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला नाही. यानंतर त्यांना शंका आली आणि त्यांनी संबंधित महिलेच्या पतीला बोलावून दरवाजा तोडला. यानंतर घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज शेजाऱ्यांनी वर्तविला. जेव्हा पोलीस घरात गेले तेव्हा एका खोलीत मीरा सिंह यांनी फाशी घेतल्याचे दिसून आले. तर 5 वर्षांची मुलगी सुप्रिया हीचा मृतदेह दिवाणवर पडलेला होता. तर घराच्या दुसऱ्या खोलीत 11 वर्षांचा त्यांचा मुलगा प्रत्यूष फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटना घडली तेव्हा मृत महिलेचा पती नोकरीवर गेलेला होता. रंजीत सिंह असे त्याचे नाव असून तो एसीसी सीमेंट प्लांटमध्ये इंजीनियर आहे. तो सकाळी 8 वाजताच नोकरीवर गेला होता. रंजीत सिंह मुळचा बिहारमधील आराचा रहिवासी आहे. तर मीरा सिंह पाटणा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विवाहाला 13 वर्ष झाले आहेत. परिसरातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित पती-पत्नीत काही वाद असल्याचे अद्याप कधीही दिसले नाही.
संबंधित महिलेने हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तीनही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.