नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी अडचणींचा समाना करावा लागत आहे. प्रसूतीवेदनांनी तळमतळत असलेल्या गर्भवती महिलेच्या मदतीला पोलीस धावल्याची घटना राजस्थानमधील सीकर येथे घडली आहे.
सीकर जिल्ह्यातील रहिवासी आपल्या गर्भवती पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर गाडीची वाट पाहत होता. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना वाहन मिळत नव्हते. यावेळी रात्री दीड वाजता लक्ष्मणगढ ठाण्यातील पोलिसांची गाडी गस्त घालत होती. तेव्हा त्यांना गर्भवती महिला गाडीची वाट पाहत असल्याचे दिसले. पोलीस महिला अधिकाऱ्यांने गर्भवती महिलेला गाडीमध्ये बसण्यास सांगितले आणि पोलीस जीप रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाली. मात्र, प्रसूती वेदना सहन न झाल्याने महिलेने रुग्णालयात जात असतानाचा बाळाला जन्म दिला. यानंतर पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहचवले असून बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी मदत केलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचविण्याव्यतिरिक्त आपल्या जीपमध्ये प्रसूती केल्याची घटनेचा उल्लेख करता येईल.