नवी दिल्ली - शहरात एका महिलेने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन मुली आणि एका मुलासह तिने आत्महत्या केली. यामधून एक वर्षाचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. तर, महिला आणि दोन मुलींचा मात्र दुर्दैवी अंत झाला.
गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. या महिलेसह तिच्या दोन्ही अल्पवयीन मुलींचा यात मृत्यू झाला आहे, तर एका वर्षाचा मुलगा यातून बचावला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंग यांनी दिली आहे.
या महिलेचे नाव किरण (वय -३०) असून, ती मंडावलीमध्ये राहत होती. ती मूळची बिहारमधील मुझफ्फरपूरची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ती दिल्लीमध्ये तिच्या पतीसह राहत होती, तर तिला सहा आणि आठ वर्षांच्या दोन मुली आणि एका वर्षांचा मुलगा होता.
आज पहाटे एका मालगाडीच्या चालकाने माहिती दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. नेमक्या कोणत्या रेल्वेखाली येऊन या तिघींचा मृत्यू झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीशी वारंवार खटके उडत असल्यामुळे महिलेने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पोलीस तिच्या पतीची चौकशी करत आहेत.
हेही वाचा : भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक क्षण; पहिल्यांदाच सर्व गाड्या धावल्या अगदी वेळेवर!