नवी दिल्ली : भारत-चीन सीमाप्रश्नासंबंधी वर्किंग मॅकॅनिझम फॉर कन्स्लटेशन अॅन्ड कोऑरडिनेशन (WMCC) ची बैठक कदाचित उद्या(गुरुवार) होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, सीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. लष्कराच्या बैठकीमध्ये दोन्ही देशांकडून एकमत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी चीनकडून होत नाही. अशातच डब्युएमसीसीचीच्या बैठकीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
याआधी डब्ल्युएमसीसीची बैठक 10 जुलैला झाली होती. बैठकीवेळी लष्करी अधिकाऱ्यांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच तणाव कमी करण्याची प्रक्रिया कशी सुरु आहे, या संबंधी चर्चा केली होती. सीमेवरील तणाव कमी करुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चीनकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही.
दोन्ही देशांनी सीमेवर चर्चा करण्यासाठी आत्तापर्यंत डब्ल्युएमसीसीच्या 16 बैठकी घेतल्या आहेत. मागील बैठकीत भारताचे नेतृत्त्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने केले होते. मात्र, चीनकडून बैठकीतील निर्णयांना हरताळ फासण्यात येत आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तरी चीनचा मुजोरपणा दिसून येत आहे. चीनच्या आक्रमक धोरणामुळे भारत चीन सीमेवरील शांततेचा भंग झाला आहे.