श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्यामुळे काश्मीरी नागरिक रेडिओच्या साहाय्याने देशात काय सुरू आहे याची माहिती घेत आहेत.
सध्या काश्मीरी नागरिकांच्या आयुष्यात रेडिओ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काश्मीर रेडिओ आणि ऑल इंडिया रेडिओच्या साहाय्याने नागरिक जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेत आहेत. 'गेल्या 5 तारखेपासून राज्यातील इंटरनेट सेवा बंद असून दूरचित्रवाणी देखील बंद आहे. भारत डिजीटल बनत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, नेहमीच येथील इंटरनेट सेवा बंद केली जाते', असे काश्मीरी तरुणाने म्हटले आहे.
म्हणून इंटरनेट सेवा बंद केली-
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मोदी सरकारने ठेवलेला हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि त्यानंतर तो दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. जम्मू-काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या एक दिवसआधी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी जम्मूमधील मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.