पणजी (गोवा)- गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेले नाफ्ता भरलेले जहाज हटविण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. जहाज हटविल्यानंतर याला जबाबदार असणाऱ्या सर्वसंबंधितांची चौकशी होऊन कारवाई होणार हे निश्चितच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
महालक्ष्मी निवासस्थानी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, दोनापावल येथे अडकलेले 'नू शी नलिनी' या जहाजाला हटविण्यावर गोवा सरकार गंभीर आहे. मागील १५ दिवस याचा सातत्याने पाठपुरावा होत आहे. यावर आम्ही बंदर कप्तान विभाग, जहाज महासंचालक आणि गृहमंत्रालयाच्या संपर्कात आहोत. सुरुवातीला नाफ्ता स्थलांतर करण्याच्या कारवाईमध्ये चूक झाली. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु, आम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे जहाज महासंचालक यांच्यासह पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे जी यावर नियंत्रण ठेवून आहे.
समितीकडे दोन कंपनीने आपली कोटेशन सादर केली आहेत. रविवारपर्यंत जहाज महासंचालकांकडे ही कोटेशन दिली जातील आणि सोमवारी ठेकेदार कंपनी निश्चित केली जाणार आहे. गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी सदर जहाजातील नाफत्याची शुक्रवारी पहाणी केली असून ते सुरक्षित असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जहाजामधील नाफ्त्याला लवकरात लवकर हलविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. आता संकट दूर करणे महत्त्वाचे आहे. परंतु, हे जहाज येथपर्यंत दाखल होण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा- हार-जीतचा प्रश्न नाही, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव कमी होईल - इक्बाल अन्सारी