नवी दिल्ली - दिल्लीचे आप सरकार आणि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे आहेत. उपराज्यपाल बैजल यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले. ही राजकारणाची वेळ नाही, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.
केजरीवाल सरकारने सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दिल्लीकरांना राखीव खाटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. हे आदेश उपराज्यपाल अनिल बैजल यांनी रद्द केले आहेत.
कोराना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगितले.
दिल्ली शहरात 31 जुलैपर्यंत 1.5 लाख खाटा लागणार आहेत. कारण इतर शहरांतील लोक उपचारांसाठी लोक राजधानीत येणार आहेत.
दिल्लीकरांना 1.5 लाख खाटांपैकी 80 हजार खाटा लागतील, असा अंदाज असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. आपल्याला कोरोनाशी एकत्रित लढावे लागणार आहे.
आप सरकार सर्वांना उपचार देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोना विरोधातील लढाई लोकांनी चळवळ करावी, असे त्यांनी आवाहन केले.