नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली आहे. गलवान व्हॅलीतील वादानंतर सरकार सीमेवर 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्यास आग्रही का नव्हते? राष्ट्रहीत सर्वोच्च असून देशाच्या हिताचे संरक्षण करणे सरकारचे काम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
गलवान खोऱ्यातील वादानंतर राहुल गांधींनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. चीनबरोबर वाद सुरु होण्यापूर्वी सीमेवर जी परिस्थिती होती तशीच स्थिती ठेवण्यास सरकार आग्रही का नव्हते? गलवान खोऱ्यावर भारताचे सार्वभौमत्व आहे, असा उल्लेख चीनबरोबरच्या चर्चेत का नव्हता, असे राहुल गांधी म्हणाले.
संरक्षण विषयक संसदेच्या स्थायी समितीच्या एकाही बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी आज पुन्हा केंद्र सरकारवर हल्ला केला. राहुल गांधी एकाही बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, ते देशाचे मनोबल कमी करत आहेत. तसेच लष्कराच्या शौर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असे नड्डा म्हणाले होते.
भारत चीनमध्ये सुमारे दोन महिन्यांपासून सुरु असलेला सीमावाद निवळण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे आणि चीनचे सैन्य सीमेवरून मागे सरकण्यास सुरुवात झाली आहे. लष्करी, राजनैतिक आणि विशेष अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांमधील वाद कमी होताना दिसून येत आहे.