नवी दिल्ली - पाकिस्तानी केंद्रीय मंत्र्याने आज संसदेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पुलवामा हल्ला हे पाकिस्तान सरकारचे मोठे यश आहे, अशी कबुली पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका मंत्र्याने दिली आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबा असल्याचे संपूर्ण जगाला माहिती आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.
बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय-
व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सगळ्या जगाला माहित आहे, पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करतो. त्यांनी याचा कितीही नकार केला तर सत्य लपू शकत नाही. संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातलेल्या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तान निवारा देतो. त्यामुळे दहशतवादाला बळी पडल्याचा आव पाकिस्तानने आणू नये, असे श्रीवास्तव म्हणाले.
पाकिस्तानचा मंत्री काय म्हणाला -
पुलवामात हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाले. हा संपूर्ण पाकिस्तानी जनतेचा विजय होता, असे वक्तव्य पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत केले. यावेळी पुढे बोलताना, 'हिंदूस्थान को घर मे घुसकर मारा', असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर संसदेतील इतर नेत्यांनी बाक वाजवत त्यांचे समर्थन केले.