नवी दिल्ली - जगभरात अद्यापही कोरोना विषाणूचा प्रसार थांबलेला नाही. लस तयार करण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजूटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना लस तयार करण्याबाबत सक्षम योजना तयार करण्याची विनंती सर्व देशांना केली आहे.
"संपूर्ण जगाबरोबरच दक्षिण-पूर्व देशांत कोरोनाचा प्रसार आणि धोका वाढतच आहे. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सक्षम जागतिक नेतृत्त्व, मजबूत आरोग्य व्यवस्था, आंतरदेशीय संपर्क आणि समन्वय, सजग जनता असणे गरजेचे आहे, असे डब्ल्युएचओच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे.
जागतिक स्तरावर कोरोना लसीच्या विकासाने वेग घेतला आहे. सक्षम आणि सुरक्षित लसीसाठी सर्व देशांनी समन्वय साधून नियोजन करून सज्ज रहायला हवे. सुरुवातीला लसीची उपलब्धता सर्वांना होणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी लसीकरण कार्यक्रमाची उद्दिष्ट्यै ठरवून योजना आखायला हवी, असे खेत्रपाल म्हणाल्या.
जगभरात आत्तापर्यंत ३ कोटी ६० लाखांपेक्षाही जास्त कोरोनाचे एकूण रुग्ण आढळून आले आहेत. तर १० लाख ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत, ब्राझील, रशियासह जगभरातील अनेक देशांत प्रसार वाढत आहे. कोरोनावरील लस अनेक देशांमध्ये विकासाच्या टप्प्यावर असून अद्याप लस बाजारात आलेली नाही. त्यामुळे सगळ्याच देशांकडून नागरिकांना कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.